Ad will apear here
Next
खळ्यातले आपटबार...


आता कोणी खळी करत नाहीत किंवा नाचणीही पिकवत नाहीत. क्वचित कुठे तरी खळी चोपण्याचे किंवा नाचणी झोडण्याचे आवाज कानांवर पडतात; पण त्या आवाजांत तो पूर्वीचा फेरही नाही आणि नादही नाही. जग आज खूप पुढे गेलं असलं आणि मानवी हातांची जागा यंत्रांनी घेतली असली, तरी बालपणीच्या अशी आठवणींनी काही क्षणापुरतं का होईना, पण माझं मन खूप मागे धावत जातं आणि खळ्यातल्या त्या आपटबारांचे आवाज कानांत घुमत राहतात. 
.........
आमच्या बालपणीच्या काळातली नैसर्गिक फटाक्यांची आतषबाजी खूप ‘पॉवरफुल्ल’ व ‘इको फ्रेंडली’ अशीच होती. दिवाळीचे दिवस हे सुगीचेच दिवस असत आणि शेतात पिकलेल्या धनधान्यानं शेतकऱ्यांची घरं भरलेली असत. साधारण दिवाळीच्या दिवसांतच आम्ही घरासमोरची खळी नव्यानं करायला सुरुवात करत असू. त्या काळात अंगणातली जमीन खणून खळं करण्यासाठी खळ्यापर्यंत पोहोचलेलं नळाचं पाणी नव्हतं. त्यामुळे तळ्यावरून हंडे भरून पाणी आणताना आम्हा मुलांची खूप दमछाक होत असे. खळ्याची जमीन खणतानाही आम्ही भावंडं ‘वाटण्या’ घालून आपापल्या वाटणीला आलेली तेवढीच जमीन खणत असू. त्यातही आमच्यातलाच कोणी पोटदुखीचं किंवा इतर काही निमित्त करून सोयीची सवलत घेत असे. 

संध्याकाळी खणून दुसऱ्या दिवशी सकाळी जमीन थंड असतानाच मोठी माणसं खळं करायला सुरुवात करत. मोठी माणसं फावड्यांनी माती ओढून चिखल करताना त्यांना खूप पाणी लागे. तितकं पाणी तळ्यावरून भरभरून आणताना आम्ही मुलं खूप दमत असू; पण एकदा खळं झालं की आपल्याला त्या खळ्यातच अभ्यास करायला मिळणार, झोपायला मिळणार या मोठ्या आनंदात आम्ही भरभर पाणी आणत असू. 

खळं करून झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळपासून खळ्याचे ‘चोप’ सुरू होत. मोठालं वजनदार लाकडी ‘भुरवणं’ घेऊन जोराजोरात ती ओली जमीन चोपण्याचं कामही आम्हा मुलांवर सोपवून मोठी माणसं भल्या पहाटे शेतात जात. कुळीथ किंवा नाचणी काढण्यासाठी ही सकाळची वेळ योग्य असे. खळं चोपतानाही आम्हा मुलांच्या वाटण्या होत. आपापसात वाटून घेतलेली तेवढीच जमीन दररोज दोनदा चोपण्याचा मक्ता आम्ही घेतलेला असे. कधी कधी खळं चोपण्यावरून आम्हा मुलांची आपापसात भांडणं होत आणि आम्ही खूप वेळा हमरीतुमरीवर येत असू. खळं चोपण्याच्या त्या दोन-चार दिवसांत माझ्या हाताला फोड येत असत. त्या दिवसांत जवळपास सगळ्या घरांसमोरची खळी करण्याचं काम जोरात सुरू असे. त्यामुळे दररोज सकाळी लवकर प्रत्येक खळ्यातल्या चोपण्याच्या आवाजांनी अख्खा गाव दुमदुमून जात असे. महागड्या फटाक्यांच्या आवाजांनाही ‘फुसकी’ पाडणारी ती भुरवण्यांच्या फटक्यांची आतषबाजी कानांना मधुर वाटत असे. 

कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नसलेली आणि शिवाय फुटलेल्या फटाक्यांसारखी अजिबात कचरा न करणारी ती आतषबाजी आम्हाला त्या काळात नवनिर्मितीचा आनंद देत असे. तुळशीच्या लग्नसोहळ्यासाठी खळं सारवून लख्ख करण्यासाठी प्रत्येक जण अशा कामांत मग्न असे. आता गावातल्या घरांची पूर्ण रयाच बदलली आहे. आज प्रत्येक घरासमोर शहाबादी फरशांची कणखर आणि कायमस्वरूपी खळी तयार झाली आहेत. आता पूर्वीसारखी अशी भुरवण्यानं चोपून कोणी खळी करत नाहीत. अशी खळी करण्यासाठीचे कष्ट करण्याची कोणाची मानसिक व शारीरिक तयारी नाही. आज सकाळी लवकर उठून अशी मातीची खळी चोपण्यासाठी कोणाच्या कमरेत ताकदही नाही; पण अशा दिवसांत कधी कधी माझ्या अंतर्मनातून अशा भुरवण्यांचे आवाज आतल्याआत घुमत राहतात.

याच दिवसांत तोडून आणलेली नाचणीची कणसं खळ्यावर सुकवून भर दुपारी वजनदार दांडक्यांनी झोडताना अशीच फटाकेवजा आतषबाजी दर वर्षी होत असे. दररोज ठरवून गावातील एकाएकाच्या खळ्यावर हा ‘झोडणी’ सोहळा साजरा होत असे. गावातले पंधरा-वीस बापये दुपारी नियोजित घरी जमून खळ्यावर कणसांचा मोठा ढीग करून एकच फेर धरून ही झोडणी करत असत. कणसांच्या झोडणीची ही आतषबाजी फटाक्यांच्या आवाजांपेक्षा किंचितही कमी नसे. फेर धरून चालणारी ही झोडणी जवळपासच्या आसमंतात एक निराळाच ‘नाद’ निर्माण करत असे. झोडणी पूर्ण झाल्यावर झोडकरी बापयांना आणि तिथे जमलेल्या बाळगोपाळांना चहा आणि पिठाच्या लाडवांचा खाऊ मिळत असे. नंतरच्या काळात या लाडवांच्या जागी उसळ किंवा मिसळपाव आले; पण पुढे कालौघात विविध ‘अशास्त्रीय’ कारणं पुढे करत आमच्या प्रांतात नाचणीची शेतीच बंद झाली.

आता कोणी नाचणी पिकवत नाहीत. क्वचित कुठे तरी असे नाचणी झोडण्याचे आवाज कानांवर पडतात; पण त्या आवाजांत तो पूर्वीचा फेरही नाही आणि नादही नाही. जग आज खूप पुढे गेलं असलं आणि मानवी हातांची जागा यंत्रांनी घेतली असली, तरी बालपणीच्या अशी आठवणींनी काही क्षणापुरतं का होईना, पण माझं मन खूप मागे धावत जातं आणि खळ्यातल्या त्या आपटबारांचे आवाज कानांत घुमत राहतात. 

- बाबू घाडीगांवकर, त्रिंबक, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग
मोबाइल : ९४२१७ ९५९५५
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZMHCH
Similar Posts
गवळदेवाचा नैवेद्य... कोकणात आजही खूप पारंपरिक प्रथा अगदी जाणीवपूर्वक जपल्या आहेत. गवळदेवाचा नैवेद्य ही त्यापैकीच एक मोठ्या अपूर्वाईनं जपलेली प्रथा. आपल्या पाळीव जनावरांना जिवापलीकडे जपणाऱ्या व गोवंशाची काळजी घेणाऱ्या अशा निसर्ग देवतेप्रति प्रामाणिक श्रद्धेची भावना असणे ही खचितच अंधश्रद्धा नाही. शिवाय या देवतेप्रति कृतज्ञता
मुडी...! बियाण्यासाठीचं धान्य साठवण्याच्या घरगुती मुड्या आज कुठे औषधालाही दिसत नाहीत. आता धान्य साठवण करून ठेवण्याइतपत शेतीही कुणी करत नाही; मात्र बालपणी पाहिलेल्या वस्तू कालौघातही पटकन विसरता येत नाहीत. ‘मुडी’विषयी बाबू घाडीगावकर यांनी केलेलं हे स्मरणरंजन...
रापण : कोकण किनारपट्टीचे सांस्कृतिक लेणे कोकणची रापण संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृतीचेच छोटे रूप! ही संस्कृती आज कोकण किनारपट्टीवरूनही अस्तंगत होत चालली आहे. म्हणूनच तिचा अभ्यास होणे ही काळाची गरज आहे. रापण संस्कृती म्हणजे सर्व संस्कृतींचे माहेरघर जणू!
आठवणीतलं गाव... कोकणातलं... धावतधावत गाडी पकडल्यानंतर गर्दीभरल्या गाडीत स्वतःला कसंबसं कोंबून टाकलं, की पावसाच्या सरीनं भिजलेल्या कपाळावर साचलेले घामाचे तेवढे थेंब रुमालाच्या टोकानं टिपताना गावाकडच्या आठवणींचा चित्रपट उलगडू लागतो...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language